संभाजीनगर बंद तर औरंगाबाद सुरू असे चालणार नाही !

Foto

शिवसेना नेते खैरेंचा इशारा

शहरात मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत असूनही एमआयएम चे खासदार लॉक डाऊन ला विरोध करीत आहेत. बैठकीला अनुपस्थित राहतात. त्यामुळेच शंका येते. पोलिसांनी कठोरपणे संचारबंदीची अंमलबजावणी करावी. संभाजीनगर बंद तर औरंगाबाद चालू असा प्रकार पुन्हा होता कामा नये, असा इशाराच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.याबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
गेल्या तीन महिन्यात किमान चार वेळेस संचारबंदी लागू करण्यात आली. त्यावेळी शहराच्या काही भागात तुफान गर्दी होती. रस्त्यावर पोलिसांसमोर नागरिक खुलेआम फिरत असतानाचे चित्र होते. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे असे प्रकार सर्रास घडत आले. त्याचा फटका सर्व शहरवासीयांना बसला आहे. शहर संसर्गाच्या गर्तेत ढकलले गेले. त्याच वेळी थेट गुन्हे दाखल केले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती. शहर बंद करायचे असेल तर सर्वच भागात कठोर अंमलबजावणी व्हायला हवी, असे खैरे म्हणाले.

 एमआयएम वर निशाणा !

 शहर लॉक डाऊन करण्याला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला होता. विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीलाही ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांची मानसिकता दिसून येते.पोलिसांपुढे खरे आव्हान आता उभे ठाकले आहे. शहरातील सर्व भागात कठोर अंमलबजावणी करण्याचा करण्यात यावी, संभाजीनगर बंद तर औरंगाबाद सुरू असा प्रकार शिवसेना खपून घेणार नाही, असा थेट इशारा खैरे यांनी दिला.  दरम्यान याबाबत लवकरच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. शिवसेनाच रस्त्यावर !
 तीन महिन्यांहून अधिक काळ शहरवासीय संचार बंदी च्या सावटात आहेत. या परिस्थितीत शिवसेनाच रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते झोकून देऊन मदत कार्यात उतरले आहेत. त्यामुळेच शिवसेनेला मोठा फटका बसला आतापर्यंत दोन नगरसेवकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. पक्षाची मोठी हानी झाली आहे. मात्र तरीही शिवसैनिक सेवाकार्य सुरूच ठेवतील, असेही ते म्हणाले.